प्रतिपश्चंद्र – विजयनगरच्या खजिन्याची रोमांचक शोधकथा

ई.स १३३६ मध्ये वज्रासारख मन आणि पोलादी मनगट असलेल्या हरीहरराय आणि बुक्कराय या दोन भावांनी गोदावरी पासून ते कावेरी पर्यंत एक साम्राज्य उभे केले. तेच ते ‘विजयनगर साम्राज्य‘! हे साम्राज्य सामर्थ्यशाली आणि संपन्न तर होतेच पण स्थापत्य व शिल्पकलेमध्ये सुद्धा प्रगत होते. पण कालांतराने या साम्राज्याला उतरती कळा लागली आणि त्यावेळी विजयनगर साम्राज्याची अफाट संपत्ती वाचवण्यासाठी विजयनगरचा शेवटचा सम्राट राजा रामरायाने ही सर्व संपत्ती सोळाशे हत्तींवर लादून एका गुप्त ठिकाणी लपवली. नंतर सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम आरंभ केली. या मोहिमेदरम्यान या विजयनगर साम्राज्याच्या राजगुरूंचे वंशज महाराजांना येऊन भेटले आणि त्यांनी विजयनगर साम्राज्याचा गुप्त खजिना महाराजांच्या स्वाधीन केला. शिवरायांनी हा खजिना स्वत:साठी न वापरता केवळ त्याची संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली.

त्यांनी त्यांचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या सोबत मिळून हा सर्व खजिना एका गुप्त ठिकाणी लपवून ठेवला आणि त्याच्या संरक्षणासाठी एक खास योजना आखली. बहिर्जींनी आपले खास असे आठ गुप्तहेर निवडले आणि त्यांना खजिन्याचे शिलेदार बनवले. गंमत म्हणजे या आठ शिलेदारांपैकी एकालाही इतर सात शिलेदारांविषयी काहीही माहिती नव्हती पण आपल्यासारखे अजून सात शिलेदार आहेत हे मात्र त्यांना माहित होते. या आठही शिलेदारांना खजिन्याचे ठिकाण माहित नव्हते पण त्यांना त्यासंबंधीचे संकेत देण्यात आले होते. बहिर्जींनी एक चावी या शिलेदारांना दिली होती पण आठही संकेत एकत्र आल्याशिवाय त्या चावीने खजिना उघडता येत नव्हता. या शिलेदारांनी प्राणपणाने खजिन्याचे रक्षण करत पुढच्या पिढीला हे संकेत हस्तांतरित करायचे होते. ज्याप्रकारे खजिन्याचे रक्षण करण्यासाठी शिलेदार होते त्याचप्रमाणे तो खजिना मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे लोकही होते. गेले जवळपास साडे तीनशे पेक्षा जास्त वर्ष या खजिन्यासाठी संघर्ष चालू आहे. मग या खजिन्याचे काय झाले? हे खुद्द रायगडाच्या तोंडून ऐकण्यासाठी डॉ प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांनी लिहिलेले ‘प्रतिपश्चंद्र‘ हे पुस्तक वाचावे लागेल. 

फोटो सौजन्य- गूगल

या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे डॉ रवीकुमार. नागपूर मधील मानसोपचार तज्ञ असलेला रवीकुमार आपला मित्र आदित्यसह औरंगाबाद येथे एका कार्यशाळेसाठी जातो. ज्या हॉटेल मध्ये ते थांबलेले असतात तेथे रात्री एका पार्टी मध्ये अपघातानेच त्याची ओळख न्यायाधीश कृष्णकांत दिक्षित यांच्याशी होते. ती पार्टी दिक्षित यांच्या निवृत्ती निमित्ताने आयोजित करण्यात आलेली असते आणि तेथे दिक्षित यांची तब्येत अचानक ढासळते. अशा वेळी तेथे उपस्थित असलेला डॉ रवीकुमार तत्परतेने त्यांच्यावर उपचार करून त्यांना ठीक करतो. कृतज्ञता म्हणून न्यायाधीश दिक्षित रवीकुमार ला एक छोटेसे गिफ्ट देतात आणि ती पार्टी तशीच पुढे चालू राहते. 

दूसरा दिवस मात्र रवीकुमार साठी अत्यंत धक्कादायक असतो. न्यायाधीश कृष्णकांत दिक्षित यांचा त्यांच्या खोलीत पंख्याला लटकलेला मृतदेह आढळून येतो आणि पोलिस त्यासाठी रवीकुमार आणि त्याचा मित्र आदित्यला दोषी मानून त्या दोघांनाही अटक करतात. रवीकुमार हा मूळचा कर्नाटकातील म्हैसूरचा असतो जेथे त्याचे वडील एक मोठे उद्योगपती असतात. ते रवीकुमारच्या जामीनाची व्यवस्था करतात आणि तो त्याच्या मित्रासह तुरुंगातून बाहेर येतो. मूळात न्यायाधीश दीक्षितांनी खोट्या नावाने रवीकुमारशी ओळख प्रस्थापित करून त्याला औरंगाबाद मध्ये वैद्यकीय कार्यशाळेच्या बहाण्याने बोलावलेले असते. ते सर्व कॉल आणि मेसेज चे रेकॉर्ड पोलिसांकडे असतात आणि त्यामुळेच दीक्षितांच्या मृत्युमध्ये रवीकुमारचा पण हात आहे असा पोलिसांना संशय असतो. 

फोटो सौजन्य- गूगल

दीक्षितांनी आपल्याला खोटे बोलून औरंगाबादला का बोलावले या विचारात असतानाच रवीकुमारला दीक्षितांनी त्याला आदल्या रात्री दिलेले गिफ्ट आठवते. तो, त्याचा मित्र आदित्य आणि प्रियल (रवीच्या वडिलांच्या कंपनीच्या औरंगाबाद ब्रांचच्या मॅनेजरची मुलगी जी ने रवीकुमारच्या जामीनाची व्यवस्था केलेली असते.) मिळून ते गिफ्ट उघडतात त्यावेळी त्यांना त्यात एक बुद्धाची मूर्ती दिसते. या मूर्तीचे रहस्य उलगडण्यापासून हा रोमांचक प्रवास सुरू होतो ते थेट खजिन्यापर्यंत येऊनच थांबतो.

त्या बुद्ध मूर्तीचे रहस्य उलगडताना रवीला दीक्षितांनी त्याच्या मोबाइलवर पाठवलेला एक टेक्स्ट मेसेज आठवतो. तो संदेश आणि बुद्ध मूर्ती यामधून त्यांना जे काही संकेत मिळतात ते न्यायाधीश दीक्षितांच्या कार्यालयाकडे जाण्याचे इशारे देत असतात. दीक्षितांच्या ऑफिस मधून त्यांना मुंबईतल्या एका घराचा पत्ता मिळतो जेथे प्रशिक सोनवणे नावाचे गृहस्थ राहत असतात. या गृहस्थांनी जवळपास वीस वर्षांपूर्वी हम्पी (विजयनगर साम्राज्याची राजधानी) मध्ये अथक संशोधन करून विजयनगर साम्राज्याच्या खजिन्याबद्दल एक महत्वाच्या माहितीचा शोध लावलेला असतो. पण दुर्दैवाने त्यांना या मध्ये आपली पत्नी आणि गुरु नागनाथ स्वामी यांना गमवावे लागते. खजिन्याच्या शोधत असलेल्या दुष्ट व्यक्तींद्वारे त्यांची हत्या केली जाते.

प्रशिक रवीला या खजिन्याचा एकंदर इतिहास आणि त्याला मिळवण्यासाठी चालू असलेल्या रक्तरंजित संघर्षाची माहिती देतात. या संघर्षात त्यांनी आपले आप्त गमावले असल्याने ते रवी,आदित्य व प्रियल या तरूण पोरांना या पासून दूर राहण्याचा कळकळीचा सल्ला देतात. या खजिन्याच्या शोधापायी पूर्ण आयुष्य उध्वस्त होईल असा इशाराही देतात. पण आता जिद्दीला पेटलेला रवी कोणत्याही परिस्थितीत या रहस्याचा शोध लावण्याचा निश्चय करतो आणि त्याचा निर्धार पाहून अखेर प्रशिकही त्यांना सामील होतो. 

त्यांचा हा शोध सोपा तर अजिबातच नसतो आणि गुप्त तर नाहीच नाही. मुळात रवीला न्या दीक्षितांच्या खुणात जाणूनबुजून अडकवलेले असते. दीक्षितांच्या मृत्युची चौकशी करणारा आयबी अधिकारी माने हा रवीला तुरुंगातून सोडल्यापासून त्याच्या मागावर असतो. रवी त्या खजिन्यापर्यंत जाण्याचे रहस्य शोधून काढेल याचा विश्वास असल्याने माने आणि त्याचा अज्ञात असा बॉस हे सातत्याने रवीच्या मागावर असतात. माने चे ब्रेन वॉश करण्यात आलेले असते. त्यामुळे त्याला आपण शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास जगासमोर मांडण्यापासून रोखण्याचे उदात्त कार्य करत असल्याचा (चुकीचा) समज असतो.

फोटो सौजन्य- गूगल

त्याचा हा अज्ञात बॉस दूसरा-तिसरा कोणी नसून खुद्द महाराष्ट्राचे राज्यपाल रामचंद्रन असतात. रामचंद्रन याला काहीही करून विजयनगर साम्राज्याचा तो खजिना हवा असतो  आणि यासाठी त्याला सोबत करत असतात ‘शिवचरित्रकार’ सूर्यकांतराव मोरे. सूर्यकांतराव स्वत:ला जावळीच्या मोर्‍यांचे वंशज मानत असतात. याच जावळीच्या मोर्‍यांना पराभूत करून शिवरायांनी रायगड जिंकला होता. याच पराभवाचा वचपा म्हणून सूर्यकांतराव शिवरायांचे प्रसिद्ध असे सिंहासन शोधत असतात ज्याचा विध्वंस करून त्यांना आपला सूड उगवायचा असतो. खजिन्याचा हा शोध रवीला मुंबईचे छ शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, राजभवन इत्यादी ठिकाणी घेऊन जातो. राजभवनाखाली असलेल्या भुयारामध्ये त्यांना शिवरायांचा अस्सल खंजीर मिळतो. पण सातत्याने मागावर असलेल्या पोलिसांना चकवण्यासाठी रवी अखेर सूर्यकांतराव मोरे यांच्याकडे मदतीस येतो. हे सर्व रामचंद्रन आणि सूर्यकांत मोरे यांनी आखलेल्या योजनेनुसारच होत असते. शिवरायांचे सिंहासन शोधून देण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात ते रवीला मदत करण्यास तयार होतात. 

विजयनगरचा खजिना आणि शिवरायांचे सिंहासन शोधण्यात हे लोक यशस्वी होतात का? हे जाणण्यासाठी हे पुस्तक एकदा वाचलेच पाहिजे. औरंगाबाद मधून सुरू झालेली ही मोहीम वेरूळच्या लेण्यापर्यंत पोचते आणि तिथूनच रायगडावर असलेल्या शिवरायांच्या सिंहासनाचा सुगावा लागतो. प्राचीन भारताचा वैभवशाली इतिहास, परकीय आक्रमण व अत्याचारामुळे झालेले अंधकारमय जीवन आणि त्यानंतर शिवरायांचा झालेला उदय अशा इतिहासाचा मागोवा घेत घेत खजिन्याच्या शोधाची चालू असलेली ही चित्तथरारक शोधकथा तुम्हाला एक उत्कृष्ट अशा काल्पनिक आणि ऐतिहासिक साहित्याचा आस्वाद घेतल्याचा आनंद देईल यात काहीच शंका नाही. 

             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *