साम्यवादाचा फोलपणा दाखवणारे कृश्चेवचे भाषण मोसादला कसे मिळाले?

दुसरे महायुध्द संपले आणि अमेरिकासोव्हिएत युनियन मध्ये शीत युद्धाला सुरुवात झाली. भिन्न विचारसरणी असलेल्या या दोन्ही महासत्तांमध्ये जग विभागले गेले. अमेरिका अनुसरीत असलेल्या भांडवलशाहीमध्ये कामकरी आणि कष्टकऱ्यांचे शोषण होत असल्याच्या भावनेने सोव्हिएत युनियनच्या साम्यवादी विचारसरणीने अनेकांना वेड लावले होते. जगभरातील या साम्यवादी चळवळीचे नेतृत्व जवळपास तब्बल २५ वर्षे सोव्हिएत युनियनचा अध्यक्ष जोसेफ स्टॅलिनने केले. पण त्याचबरोबर त्याने साम्यवादी विचारधारा आणि सोव्हिएत राज्यकारभाराचा खरा चेहरा जगाला कळू नये याचीही पुरेपूर काळजी घेतली होती.

पण त्याच्या मृत्यूनंतर सोव्हिएत युनियनचा अध्यक्ष बनलेल्या निकिता कृश्चेवने २०व्या अखिल विश्व साम्यवादी परिषदेत भाषण करताना स्टॅलिनचा साम्यवादाचा बुरखा टराटरा तर फाडलाच पण अप्रत्यक्षपणे साम्यवादाचा फोलपणाही दाखवून दिला. कृश्चेवचे हे भाषण अत्यंत स्फोटक होते. ते जगाला कळाले असते तर जगभरातील साम्यवादी चळवळ मरणपंथाला लागली असती. म्हणूनच कृश्चेवच्या या भाषणाची प्रत सोव्हिएत युनियनच्या बाहेर कुणालाही मिळणार नाही याची कडेकोट खबरदारी घेण्यात आली होती. पण तरीही मोसादला या भाषणाची एक प्रत मिळवण्यात यश आले. कसे ते आज आपण पाहू.

साम्यवादाचा फोलपणा दाखवणारे कृश्चेवचे भाषण मोसादला कसे मिळाले?
निकिता कृश्चेव (फोटो साभार – google)

व्हिक्टर श्लिपमन नावाचा एक व्यक्ती सोव्हिएत युनियनच्या शेजारी असलेल्या पोलंड देशाचा नागरिक होता. हा व्हिक्टर ज्यू होता. दुसऱ्या महायुध्दात जर्मनीने पोलंडवर हल्ला करण्यापूर्वीच व्हिक्टरने आपल्या कुटुंबासह सोव्हिएत युनियन मध्ये स्थलांतर केले. व्हिक्टर त्यावेळी १३-१४ वर्षांचा होता आणि आपल्या उमलत्या वयातील महत्त्वाची काही वर्षे त्याने सोव्हिएत युनियन मध्ये व्यतीत केली. त्यामुळे साम्यवादी विचारधारेशी जवळचा संपर्क येऊन व्हिक्टर कडवा साम्यवादी बनला. युद्धानंतर व्हिक्टर कुटुंबासोबत पोलंडला परतला. तेथेच पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण करून तो पोलिश न्यूज एजन्सी मध्ये काम करू लागला. आपल्या परिश्रमाने भराभर प्रगती करत तो वरिष्ठ संपादक पदापर्यंत पोहोचला.

या दरम्यानच त्याचे आई वडील आणि बहिणीने इस्रायल मध्ये स्थलांतर केले पण व्हिक्टर मात्र पोलंड मध्येच राहिला. आपल्या साम्यवादाच्या वेडापुढे त्याचे ज्यू असणे दुय्यम ठरले होते. १९५५ मध्ये वडील आजारी असल्याने व्हिक्टर एकदा इस्रायलला जाऊन आला. तिथल्या मोकळ्या ढाकळ्या वातावरणामुळे त्यालाही इस्रायलचे आकर्षण वाटू लागले पण साम्यवादही सोडवत नव्हता. याच द्विधा मनस्थितीत तो पोलंडला परतला. 

Soviet Union | History, Leaders, Flag, Map, & Anthem | Britannica
साम्यवादाचा फोलपणा दाखवणारे कृश्चेवचे भाषण मोसादला कसे मिळाले?
सोविएत यूनियन (फोटो साभार – google)

पोलंड मध्ये व्हिक्टर चे ल्युसिया नावाच्या एका विवाहित महिलेशी प्रेम प्रकरण सुरू होते. ही ल्यूसिया पोलिश साम्यवादी पार्टीचे जनरल सेक्रेटरी एडवर्ड ओशाबची सेक्रेटरी होती. पत्रकार असल्याने तसेच ल्यूसिया त्याची प्रेयसी असल्याने व्हिक्टरला पोलिश साम्यवादी पार्टीच्या कार्यालयात मुक्त प्रवेश मिळायचा. 

असाच एकदा तो ल्युसियाला भेटण्यासाठी तिच्या कार्यालयात गेला असता तिच्या टेबल वर त्याला “गोपनीय” असा शिक्का मारलेली लाल रंगाची एक पुस्तिका दिसली. त्याने ल्युसियाला त्या पुस्तिकेबाबत विचारले असता तीने अत्यंत बेफिकीरपणे सांगितले की ती पुस्तिका म्हणजे कृश्चेवचे (ते चर्चित) भाषण आहे. कदाचित ल्युसियाला त्या भाषणाचे महत्व माहितीच नव्हते. पण हे ऐकताच व्हिक्टरच्या अंगावर मात्र रोमांच उभे राहिले. पत्रकार असल्याने कृश्चेवच्या त्या भाषणाचे महत्व व्हिक्टरला माहित होते. तसेच ते भाषण जगाला कळू नये म्हणून सोव्हिएत युनियनची चाललेली धडपडही त्याला माहित होती. हे भाषण इतके स्फोटक होते की ते मिळवण्यासाठी अमेरिकेची गुप्तहेर संस्था CIA १० लाख डॉलर्स खर्च करण्यास तयार असल्याचेही व्हिक्टरच्या कानावर आले होते. 

व्हिक्टरने ल्युसिया कडून त्या भाषणाची प्रत एक दोन तासांसाठी मागितली ज्यासाठी ल्युसियाने होकार दिला. घरी येऊन ते भाषण पूर्ण वाचल्यावर साम्यवादाचा क्रूर चेहरा व्हिक्टरला कळून चुकला. ते स्फोटक सत्य वाचल्यावर व्हिक्टरची साम्यवादाची नशा पूर्णपणे उतरली. साम्यवादाचा फोलपणा त्याला कळून चुकला. त्याने त्या भाषणाची प्रत घेऊन तडक पोलंड मधील इस्रायलचा दूतावास गाठला. तिथल्या राजनैतिक अधिकाऱ्याला त्या भाषणाचे महत्व माहित होते. त्याने त्या भाषणाची प्रत तयार करून मूळ प्रत व्हिक्टरला परत केली आणि व्हिक्टरने ती मूळ प्रत ल्युसियाला परत केली. सगळे एकदम शांतपणे झाले आणि कृश्चेवचे ते भाषण आता सोव्हिएत युनियनच्या बाहेर गेले आहे याची कोणाला खबरबातही नव्हती. 

पोलंड वरून ते भाषण इस्रायलला पोचवण्यात आले. इस्रायलची अंतर्गत गुप्तहेर संस्था शबाक चे प्रमुख मनोर यांनी सर्वप्रथम इस्रायल मध्ये हे भाषण वाचले. त्या भाषणाचे महत्व ओळखून त्यांनी ताबडतोब इस्रायलचे पंतप्रधान गुरियन यांची भेट घेऊन त्यांना ही बातमी दिली. ते भाषण वाचून रोमांचित झालेल्या गुरियन यांनी मनोर यांना त्या भाषणाचा हवा तसा वापर करण्याची मुभा दिली. मनोर यांनी मोसाद चे संचालक इस्सार हेरेल यांच्याशी सल्लामसलत केली आणि ते भाषण CIA कडे द्यायचे ठरले.

साम्यवादाचा फोलपणा
मोसाद चे बोधचिन्ह (फोटो साभार – google)

मोसादचा एक हेर स्वतः त्या भाषणाची प्रत घेऊन अमेरिकेला गेला आणि ते भाषण CIA कडे सुपूर्त केले. दोन आठवडे सर्व अंगांनी कसून तपासणी केल्यावर CIA ने कृश्चेवचे ते भाषण अस्सल असल्याचा निर्वाळा दिला. इस्रायलचे पंतप्रधान गुरियन यांच्या संमतीने CIA ने ते भाषण प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. फक्त हे भाषण इस्रायल कडून मिळाल्याचे गोपनीय ठेवण्यात आले होते. कृश्चेवचे भाषण जगभरात प्रसारित झाले. साम्यवादाचा बुडबुडा फुटायला सुरुवात झाली होती आणि अखेर याचीच परिणीती काही वर्षांनी सोव्हिएत युनियन कोसळण्यात झाली. 

केवळ एका व्यक्तीच्या बेफिकीरपणामुळे अत्यंत महत्वाचे असे कृश्चेवचे ते भाषण जगाला कळाले. साम्यवादाचा फोलपणा उघडा पडला. साम्यवादाचा पोलादी पडदा गळून पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *