१९४५ मध्ये नेमके काय झाले? नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे रहस्य

१८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवान मधील सायगाव येथे झालेल्या कथित विमान अपघातात झालेला नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू हे आजपर्यंतचे भारतातील कदाचित सर्वात मोठे रहस्य असावे. १९४५ मध्ये नेमके काय झाले? या रहस्याचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत भारत सरकारने तीन वेगवेगळ्या समित्या स्थापूनही हे रहस्य अजूनही उलगडता आलेले नाही. नेताजींच्या या रहस्याबाबत सत्य शोधून काढण्याची इच्छाशक्ती स्वतंत्र भारतातील कोणत्याही सरकारने दाखवली नाही हे सत्य आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेल्या आणि आझाद हिंद सरकारचे पहिले राष्ट्रपती असणार्‍या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासारख्या अत्यंत महत्वाच्या व्यक्तीच्या मृत्युचा कोणताही निर्णायक पुरावा नसताना आणि १८ ऑगस्ट १९४५ च्या त्या कथित विमान अपघातानंतरही नेताजी जीवंत असल्याच्या बातम्या वेगवेगळ्या स्त्रोतांकडून कानी पडत असतांनाही या रहस्याचा छडा लावून सत्य समोर आणण्याचे काम गांभीर्याने का केले गेले नाही हे एक गूढच आहे. याच रहस्याचा जवळपास १० वर्षे जिद्दीने पाठपुरावा करून आणि अत्यंत परिश्रमाने श्री अनुज धर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद ‘नेताजींच्या मृत्युचे गूढ – भारताचे सर्वात मोठे रहस्य’ या पुस्तकाद्वारे डॉ मीना शेटे संभू यांनी केला आहे. नेताजींच्या या रहस्याशी निगडीत अनेक ज्ञात अज्ञात पैलूंच्यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. 

नेताजी सुभाषचंद्र बोस
नेताजी सुभाषचंद्र बोस

कॉंग्रेस सोडल्यानंतर सुभाष चंद्र बोस यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि ब्रिटिशांविरोधात सशस्त्र लढा चालू केला. या आझाद हिंद फौजेने जपानसोबत मिळून भारताच्या पूर्वेकडील सीमेवर धडका द्यायला सुरुवात केली. पण १९४५ मध्ये अमेरिकेने केलेल्या अण्वस्त्र हल्ल्यामुळे जपान खिळखिळा झाला होता. त्यामुळे नेताजींना जपानकडून पुढील कोणतीही मदत मिळण्याची आशा अंधूक झाली होती. त्यामुळे आझाद हिंद सरकार आणि आझाद हिंद फौजेच्या भविष्यातील रणनीतीविषयी चर्चा करण्यासाठीच सुभाष चंद्र बोस हे १९४५ च्या ऑगस्ट महिन्यात टोकिओला निघाले होते. ते टोकिओला पोहचू शकले नाहीत पण ते प्रवास करत असलेल्या विमानाच्या अपघाताची आणि नंतर बोस यांच्या मृत्युची बातमी भारतात येऊन धडकली. त्यांच्या या विमान प्रवासापासून ते त्यांच्या कथित मृत्यूनंतर पार पाडण्यात आलेल्या सर्व सोपस्कारांबद्दल एकदम सविस्तर माहिती पुस्तकाच्या सुरूवातीला दिली आहे. 

नेताजींच्या मृत्युची बातमी भारतात पोचल्यावर महात्मा गांधी, पंडित नेहरू इत्यादींसह अनेक नेत्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. पूर्ण भारतात या बातमीने शोककळा पसरली. पण त्यासोबतच अनेक ब्रिटिश उच्च अधिकारी तसेच अनेक भारतीयांच्या मनात मात्र नेताजींच्या या कथित मृत्युविषयी संशय निर्माण झाला. नेताजी मित्रराष्ट्रांच्या तावडीत सापडू नयेत आणि त्यांना भूमिगत होता यावे म्हणून त्यांच्या मृत्युचा बनाव घडवून आणण्यात आला असावा अशी शंका ब्रिटिशांना आली आणि इथूनच भारताच्या या सर्वात मोठ्या रहस्याची सुरुवात झाली. जर नेताजींचा मृत्यू १९४५ मध्ये विमान अपघातात झाला नव्हता तर मग त्यांच्यासोबत काय झाले? याबाबत अनेक वेगवेगळे सिद्धांत आजपर्यंत मांडण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही महत्वाचे सिद्धांत म्हणजे बोस हे रशियात निसटून गेले आहेत, बोस चीन मध्ये आहेत, १८ ऑगस्टला तैवान मधील सायगाव मध्ये कोणताही विमान अपघात झालेलाच नव्हता, बंगाल मधील शौलमारी साधू किंवा उत्तर प्रदेशातील फैजाबाद मधील भगवानजी नावाचे गृहस्थ हे सुभाष बोस होते का इत्यादी इत्यादी. 

नेताजी सुभाषचंद्र बोस-आझाद हिंद फौज
नेताजी सुभाषचंद्र बोस-आझाद हिंद फौज

या रहस्याचा उलगडा करण्यासाठी आणि इतर अनेक सिद्धांतांची उकल करण्यासाठी आजपर्यंत शहानवाज आयोग, खोसला आयोग, मुखर्जी आयोग इत्यादी आयोगांची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी शहानवाज आयोग आणि खोसला आयोग या दोन्ही आयोगांनी १८ ऑगस्ट १९४५ रोजी सायगाव मध्ये विमान अपघात झाला होता व त्यात नेताजींचा मृत्यू झाला होता असा निष्कर्ष काढला. इतकेच नाही तर जपानमधील रेंकोजी मंदिरातील रक्षा या नेताजींच्याच आहेत असेही या दोन्ही आयोगांनी ठामपणे सांगितले. आश्चर्य म्हणजे या दोन्ही आयोगांनी तैवान मधील प्रत्यक्ष विमान अपघाताच्या स्थळी जाऊन पाहणी आणि चौकशी केलीच नव्हती आणि केवळ साक्षीदारांच्या साक्षीवरून हे निष्कर्ष काढले होते. तरीही तत्कालीन कॉंग्रेस सरकारांनी या दोन्ही आयोगांचे अहवाल स्वीकारले.

पण सरकार वगळता बहुतांश लोकांनी या अहवालांवर विश्वास ठेवला नाही. यापैकी काही लोकांनी १९९८ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार १९९९ मध्ये या घटनेचा पुन्हा एकदा नव्याने तपास करण्यासाठी  मुखर्जी आयोगाची स्थापना करण्यात आली. इतर दोन्ही आयोगांप्रमाणे मुखर्जी आयोगाने उथळपणे चौकशी न करता एकदम खोलात जाऊन चौकशी केली. यामध्ये प्रत्यक्ष साक्षीदारांच्या साक्षी, घटनास्थळाला भेट देणे तसेच उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांचा कसून अभ्यास इत्यादी गोष्टींचा समावेश होता. त्यावरून मुखर्जी आयोगाने नेताजींचा १९४५ मध्ये विमान अपघातात मृत्यू झाल्याचा’ आधीच्या दोन्ही आयोगांचा निष्कर्ष नाकारला आणि निष्कर्ष काढला की ‘१९४५ मध्ये विमान अपघातात नेताजींच्या मृत्युचा कोणताही निर्णायक पुरावा नाही. तसेच नेताजींना सुरक्षित निसटून जाता यावे यासाठीच एक गुप्त योजना बनवण्यात आली आणि विमान अपघाताचा बनाव रचण्यात आला हे मानण्यास पूर्ण वाव आहे’. परंतु २००६ साली तत्कालीन कॉंग्रेस सरकारने हा अहवाल फेटाळला. 

महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस
महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस

या आयोगाच्या चौकशीसोबतच लेखकाने शौलमारी साधू आणि भगवानजी यांच्या नेताजी असण्याच्या सिद्धांताचेही सविस्तर विवेचन या पुस्तकात केले आहे. उत्तर बंगाल मध्ये राहणार्‍या शौलमारी साधूविषयी कालांतराने ते नेताजी नसल्याचे सिद्ध झाले असले तरी उत्तर प्रदेशातील फैजाबाद मधील भगवानजी या गृहस्थाचे गूढ मात्र अखेर पर्यंत कायम राहिले. नेताजींशी संबंधित सर्व गोपनीय कागदपत्रे आणि फाइल आजही भारतात तसेच रशिया, चीन, विएतनाम, तैवान, ब्रिटन इत्यादी देशांमध्ये आहेत. पण यापैकी फार थोडी कागदपत्रे श्री अनुज धर मिळवू शकले. उर्वरित इतर फाइल आणि कागदपत्रांबाबत मात्र कोणताही सकारात्मक प्रतिसाद कोणाकडूनही लेखकाला मिळाला नाही.

अमेरिकेसारखी महासत्ता देखील ठराविक काळानंतर आपली गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करत असताना भारत सरकार मात्र नेताजींसारख्या अत्यंत महत्वाच्या व्यक्तीशी संबंधित अनेक कागदपत्रे गोपनीय का ठेवते हे मात्र समजण्यापलीकडचे आहे. तसेच भारत सरकारने ज्या इतर देशांमध्ये (विशेषत: रशिया) नेताजींशी संबंधित कागदपत्रे व फाइल असण्याची शक्यता आहे, त्या देशांकडून ती कागदपत्रे मिळवण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. भारत सरकारची ही अनास्था व उदासिनता खिन्न करून टाकणारी आहे. 

नेताजींच्या या एकूण प्रकरणांमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षींमध्ये अनेक विसंगती होत्या. तसेच नेताजींच्या १९४५च्या विमान अपघातामधील मृत्युचा कोणताही निर्णायक पुरावा नव्हता. असे असूनही आजपर्यंत भारत सरकारने या रहस्याचा उलगडा करून सत्य देशासमोर मांडण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केलेले नाहीत. किंबहुना बोस यांच्या या रहस्याकडे दुर्लक्ष करण्याचेच काम बहुतेक सरकारांनी केले. श्री अनुज धर यांनी या पुस्तकाद्वारे नेताजींच्या या गुढाचा शोधक मर्मदृष्टीने वेध घेतला आहे. अधिकृत सरकारी कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेऊन या रहस्याचा शोध घेण्यात आणि बोस यांना न्याय देण्यात भारत सरकारने पद्धतशीरपणे आणलेले अडथळे लेखकाने आपल्या पुस्तकात स्पष्टपणे समोर आणले आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे रहस्य

आधुनिक भारतात दीर्घकाळ या मुद्यावरची वादग्रस्तता टिकून राहिली आहे. हा प्रश्न निर्णायकपणे सोडवण्यासाठी काही उपाययोजनांची रूपरेषाही अनुज धर आपल्या या पुस्तकात देतात. पण भारत सरकार (मग केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असो) या उपाययोजना किती गांभीर्याने घेईल ही पण शंकाच आहे. पण लेखकाने सर्वत्र विखुरलेले तुकडे एकत्र आणून अत्यंत मुद्देसूदपणे या रहस्याचा धांडोळा आपल्या पुस्तकात घेतला आहे त्याबद्दल ते नक्कीच प्रशंसेला पात्र ठरतात. तसेच डॉ मीना शेटे संभू यांनीही मूळ पुस्तकाचा आशय अजिबात बदलणार नाही याची काळजी घेत उत्कृष्टपणे या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे. एकूणच नेताजींच्या या रहस्याची आणि त्या सोडवण्यासाठी केलेल्या उत्कंठावर्धक प्रयत्नांची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी श्री अनुज धर यांचे हे पुस्तक एकदा तरी वाचलेच पाहिजे.               

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *