स्पाय प्रिन्सेस - जॉर्ज क्रॉस विजेती भारताची महिला गुप्तहेर

स्पाय प्रिन्सेस – जॉर्ज क्रॉस विजेती भारताची महिला गुप्तहेर

ती माताहारी सारखी फार मोठी गुप्तहेर नव्हती पण तीने दुसर्‍या महायुद्धात जे काही हेरगिरीचे कार्य पार पाडले तेसुद्धा उल्लेखनीय होते. तिच्या या कामगिरीने दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिशांना जर्मनी विरूद्ध बहुमोल माहिती मिळत गेली. तिच्या या कामगिरीबद्दल तिला जॉर्ज क्रॉस हा ब्रिटिश सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही देण्यात आला. गंमत म्हणजे तिचे वडील भारतीय होते आणि आई अमेरिकन ! तिचा जन्म रशिया मध्ये झाला आणि ती तिच्या कुटुंबासह फ्रांस मध्ये स्थायिक झाली. दुसर्‍या महायुद्धामध्ये तिने चक्क ब्रिटिश हवाई दलात प्रवेश करून नंतर त्यांच्यासाठी जर्मनी विरूद्ध हेरगिरी केली. असा जागतिक आयाम लाभलेल्या त्या स्त्रीचे नाव होते नूर इनायत खान आणि तिचा हा जीवन प्रवास श्रावणी बासु यांनी ‘स्पाय प्रिन्सेस’ या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद भारती पांडे यांनी केला आहे. 

स्पाय प्रिन्सेस
स्पाय प्रिन्सेस

बडोद्यातील भारतीय सूफी शिक्षक हजरत इनायत खान आणि त्यांची अमेरिकन पत्नी ओरा रे बेकर यांच्या पोटी १९१४ मध्ये मॉस्को येथे नूरचा जन्म झाला. हजरत इनायत खान यांचे आजोबा मौला बक्ष यांनी बडोदा विश्वविद्यालयामध्ये संगीत विभाग सुरू केला होता आणि त्यांची पत्नी ही टिपू सुलतानाच्या वंशातली होती. हजरत इनायत खान आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार सूफी तत्वज्ञान पश्चिमेकडे पोचवण्यासाठी भारत सोडून रशियात पोचले होते. सूफी तत्वज्ञान प्रसाराच्या निमित्ताने हजरत इनायत खान यांचा जगभर प्रवास होत असे आणि अशाच एका अमेरिकेच्या दौर्‍यात त्यांची भेट त्यांची भावी पत्नी ओरा रे बेकर हिच्याशी झाली.

मॉस्को मध्ये नूरचा जन्म झाल्यावर काही दिवसातच रशियातील अस्थिर राजकीय स्थितीमुळे इनायत खान आपल्या कुटुंबासह रशिया सोडून फ्रांस मध्ये गेले. पण लवकरच पहिले महायुद्ध सुरू झाल्यामुळे हे कुटुंब लंडनला आले आणि जवळपास पुढील सहा वर्षे तेथेच राहिले. पण त्यांच्या या वास्तव्यात ब्रिटिश गृहखाते सतत त्यांच्यावर बारीक नजर ठेवून होते. कारण त्याकाळी भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळ जोरात चालू होती आणि इनायत खान हेही मूळचे भारतीयच होते. अखेर ब्रिटिशांच्या या ससेमिर्‍याला कंटाळून त्यांनी पहिले महायुद्ध संपल्यावर पुन्हा आपला बाडबिस्तरा हलवला आणि पॅरिस जवळच्या एका खेड्यात जाऊन स्थायिक झाले. तेव्हापासून दुसर्‍या महायुद्धात नाझी जर्मनीने फ्रांसचा ताबा घेई दरम्यानच्या काळात हे कुटुंब आपल्या ‘फझल मंजिल’ या पॅरिस मधल्या घरातच राहिले. 

स्पाय प्रिन्सेस
नूर इनायत खान

‘फझल मंजिल’ मध्ये हजरत इनायत खान यांचे गायन आणि सूफी तत्वज्ञानावर शिबिरे भरत. त्यांनी तेथे सर्वधर्मीय अर्चनेला ही प्रारंभ केला. घरातील या सूफी तत्वज्ञानाचा नूर आणि तिच्या भावंडांवर गाढ प्रभाव होता. त्यासोबतच नूर ने वडिलांकडून भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यासही सुरुवात केली होती. तिचे बालपण आणि कॉलेज चे शिक्षण पॅरिस मध्येच झाले. इथेच तिने कविता आणि लहान मुलांसाठी कथा लिहायला प्रारंभ केला. एक लेखक म्हणून नूर हळू हळू स्वत:ला यशस्वीपणे पॅरिस मध्ये प्रस्थापित करत होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ०१ सप्टेंबर १९३९ मध्ये जर्मनीच्या पोलंड वरील हल्याने दुसर्‍या महायुद्धास सुरुवात झाली आणि त्यानंतर जवळपास वर्षभराने जून १९४० मध्ये नाझी आक्रमणाच्या भीतीने नूर आणि तिच्या कुटुंबाने पॅरिस सोडले आणि ते पुन्हा ब्रिटन मध्ये आले. 

नूरच्या मनात नाझींविषयी द्वेष होता. म्हणूनच ऑगस्ट १९४० मध्ये जर्मनीने लंडनवर बॉम्बहल्ले करायला सुरुवात करताच तिने ब्रिटिश हवाईदलात प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला. १९ नोव्हेंबर १९४० मध्ये नूर इनायत खान ब्रिटिश हवाई दलात ‘एयरक्राफ्ट वुमन सेकंड क्लास’ या हुद्दयावर रुजू झाली. त्यानंतर नूरने बिनतारी यंत्र चालक म्हणून प्रशिक्षण घेतले आणि ती सांकेतिक संदेश देण्या-घेण्यात एकदम प्रशिक्षित झाली. दुसरीकडे संपूर्ण युरोप दुसर्‍या महायुद्धात पेटत होते. जर्मनीने बहुतांश युरोपवर आपला कब्जा केला होता. जर्मनीच्या बलाढ्य सेनेपुढे युरोपातील एक एक देश कोलमडून पडले होते. त्यावेळी संपूर्ण युरोपात केवळ ब्रिटनच जर्मनीला तोडीस तोड टक्कर देत होता. अशा वेळी जर्मनीला पराभूत करण्यासाठी पारंपरिक युद्धासोबतच इतरही काही मार्गांचा अवलंब करणे गरजेचे होते. त्यादृष्टीनेच ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी SOE (स्पेशल ऑपरेशन एक्झिक्युटिव) ही खास संस्था स्थापन करण्याचे आदेश दिले. या संस्थेचे मुख्य उद्देश होते युरोपात एक अशी नवीन गुप्तहेर यंत्रणा उभी करणे ज्याद्वारे जर्मन सैन्याने जिंकलेल्या देशातील जर्मन विरोधी क्रांतीकारकांना मदत करायची आणि त्याद्वारे जर्मन युद्धप्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न करायचा. 

स्पाय प्रिन्सेस
लंडनवर बॉम्बहल्ले

या उद्देशानुरूप SOE ला जर्मनव्याप्त फ्रांस मध्ये काही गुप्तहेर पाठवायचे होते जे तेथील जर्मन सैन्याच्या हालचालींची इत्यंभूत माहिती सांकेतिक भाषेत बिनतारी यंत्रणाच्या मदतीने ब्रिटनला पाठवू शकतील. अशी व्यक्ती बिनतारी यंत्रणा चालवणे आणि सांकेतिक संदेश देवाण-घेवाणीतील तज्ञ असणे गरजेचे होते. त्या सोबतच त्या व्यक्तीला फ्रेंच भाषा आणि फ्रेंच संस्कृतीबद्दल पूर्ण ज्ञान असणेही आवश्यक होते जेणेकरून ती व्यक्ती फ्रेंच समाजात सहज मिसळून जाईल आणि नाझींना कोणतीही शंका येणार नाही. नूर यासाठी सर्वोत्तम उमेदवार होती. कारण तिच्या आयुष्यातला बराच मोठा काळ पॅरिस मध्ये व्यतीत झाला होता त्यामुळे तिला फ्रेंच भाषा आणि फ्रेंच संस्कृती यांचे सखोल ज्ञान होते. शिवाय ती ब्रिटिश हवाईदलात बिनतारी यंत्रणा चालक म्हणूनच काम करत होती. SOE ने तिला हेरले आणि तिची मुलाखत घेऊन तिची फ्रांस मध्ये काम करण्यासाठी निवड केली. 

गुप्तहेरीचे कठोर असे प्रशिक्षण घेतल्यावर जून १९४३ मध्ये नूर फ्रांस मध्ये दाखल झाली आणि तत्काळ तिने आपल्या कामाला सुरुवात केली. त्यावेळी जर्मनीचा फ्रांस वर पूर्ण कब्जा झाला होता. जागोजागी जर्मन गुप्त पोलिस ‘गेस्टापो’ चे अधिकारी फिरत असत. तसेच बिनतारी यंत्रणेद्वारे पाठवले जाणारे संदेश पकडण्यासाठी ही छुप्या अॅंटेनाद्वारे नाझी सैनिक सतत पाळतीवर असत. अशा परिस्थितीत पकडल्या गेलेल्या हेरांसाठी ‘मृत्यू’ हीच सुटका असे. म्हणूनच अशा धोकादायक वातावरणात काम करताना सातत्याने काळजी घेणे नूर साठी आवश्यक होते. तिला सातत्याने आपले राहायचे ठिकाण बदलावे लागे, कोणताही संदेश पाठवल्यावर तत्काळ ती जागा सोडावी लागे. अवजड आणि कोणाच्याही नजरेत ठळकपणे भरेल असे बिनतारी यंत्र घेऊन सातत्याने प्रवास करणेही जोखमीचे असायचे. अशा वेळी तिचे फ्रेंच भाषा आणि संस्कृतीचे ज्ञान कामाला यायची. यामुळेच नूर बर्‍याचदा गेस्टापोच्या तावडीत जाण्यापासून बालबाल बचावली होती.

स्पाय प्रिन्सेस
जर्मनीचा फ्रांसवर कब्जा

परंतू गेस्टापो ही सतर्क होते. नूर ज्या गुप्तहेर मंडळासाठी काम करत होती त्या मंडळाच्या बहुतांश सदस्यांना गेस्टापो ने पकडले आणि त्याद्वारेच त्यांना नूर ची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारेच पूर्ण पॅरिस मध्ये नूर ची शोध मोहीम सुरू होती. अशावेळी अक्षरश: एकाकी पडली असतानासुद्धा नूर ने ब्रिटनला परत येण्याची SOE ची सूचना अमान्य केली आणि आपले काम नेटाने चालू ठेवले. पकडले गेल्यास आपली काय अवस्था होईल याची पूर्ण कल्पना असतांनाही आपले काम चालू ठेवण्याचा नूर ने केलेला निश्चय खरोखर कौतुकास्पद होता. प्रचंड धोके पत्करून ही अशा काळात नूर सातत्याने बहुमोल माहितीचे प्रक्षेपण करत राहिली. यामुळेच ब्रिटिशांना बहुमोल अशी माहिती मिळत राहिली. पण अखेर गुप्तहेर मंडळातील एका सदस्यानेच केलेल्या विश्वासघातामुळे १३ ऑक्टोबर १९४३ ला नूर जर्मन गेस्टापोच्या तावडीत सापडली. 

गेस्टापोच्या प्रचंड अशा छळाला तोंड देऊनही नूर ने तिच्या बिनतारी यंत्रणेबद्दल आणि तिच्या इतर सहकार्‍यांबद्दल काहीही माहिती द्यायला नकार दिला. या छळाला ती समर्थपणे तोंड देत होती. गेस्टपोच्या तावडीतून पळून जाण्याचे दोन अयशस्वी प्रयत्नही तिने केले होते. त्यामुळेच तिला जर्मनीकडून ‘अतिधोकादायक कैदी’ या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले होते. काही काळाने नूर ची रवानगी कुप्रसिद्ध अशा ‘डाखाऊ‘ छळछावणीत करण्यात आली. तेथेच तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले आणि एका महत्वपूर्ण कामगिरीचा दुर्दैवी शेवट झाला. 

भारताची महिला गुप्तहेर
नाझी छळछावणी

नूर ब्रिटिशांसाठी काम करत असली तरी ती शेवटी एक भारतीय होती. तिचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा होता आणि जिवंत राहिली असती तर युद्ध संपल्यानंतर ती ब्रिटिशांविरोधात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उतरली असती. परंतू नूर आणि तिच्या सहकार्‍यांनी दुसर्‍या महायुद्धात जे उल्लेखनीय कार्य केले त्यामुळे जर्मनीचा पाडाव करणे सोपे होऊन गेले. नूर माताहारी सारखी फार मोठी हेर नव्हती पण दोघांच्यामध्ये एक साम्य होते. दोघांनाही शत्रूने पकडून अनन्वित छळ केला होता आणि दोघांनाही गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. पण नूर ने केलेल्या अतुलनीय कामामुळे दुसरे महायुद्ध जवळपास काही महिने आधीच संपले असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.              

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *