आयसी८१४ विमानाच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य माहिती

दोन व्यक्ती विमानातून धावत आल्या. “ते ओरडत होते, ‘खाली झुका, खाली झुका'” थरथर कापत सुभाष कुमार त्या घटना आठवत होते. अपहरणकर्त्यांच्या या मागणीवर बर्‍याच प्रवाश्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि म्हणून अपहरणकर्त्यांनी अशा सर्व प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच विमानावर अपहरणकर्त्यांनी पूर्णपणे ताबा मिळवला. आयसी८१४ या इंडियन एयरलाइन्सच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य माहिती सांगणार्‍या ‘IC 814 Hijacked – The inside story’’ या पुस्तकाची सुरुवात लेखक वरील थरारक शब्दात करतो तेव्हा जवळपास २१ वर्षांनंतरही अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

Image Courtesy – Google

आयसी ८१४ या विमानाचे २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडू वरून नवी दिल्ली ला जात असताना अपहरण करण्यात आले. आयसी ८१४ मधील फ्लाइट इंजिनियर श्री अनिल के जग्गिया यांनी श्री. सौरभ शुक्ला या शोध पत्रकारासोबत मिळून आयसी८१४ विमानाच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य माहिती मांडणारे हे पुस्तक लिहिले आहे. या २२३ पानाच्या पुस्तकात एकूण ११ अध्याय आहेत आणि ते श्री. रुपीन कट्याल यांच्या स्मृतीस समर्पित आहेत ज्यांना दहशतवाद्यांनी या अपहरणाच्या दरम्यान ठार केले.हे पुस्तक म्हणजे विमानाच्या केबिन क्रू च्या एका सदस्याचे विमान अपहरणाच्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचे वर्णन आहे.

पुस्तकातील पहिला चॅप्टर मध्ये विमानाच्या नवी दिल्ली ते काठमांडू या प्रवासाविषयी आणि त्यानंतर काठमांडू ते नवी दिल्ली या प्रवासाविषयी माहिती देण्यात आली आहे. हे विमान नवी दिल्ली ला परतत असताना दुपारी सुमारे ४.३९ वाजता भारतीय हवाईक्षेत्रात दाखल झाले आणि त्याचवेळी त्याचे अपहरण करण्यात आले. ख्रिसमस साजरा करण्याची आणि नवीन सहस्रकाच्या स्वागताची आतुरतेने वाट पाहणार्‍या व त्यासाठी योजना आखलेल्या केबिन क्रू आणि सर्व प्रवाशांना या अपहरणाने मोठा धक्का बसला. काठमांडू मधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचारीदेखील कदाचित याच उत्सवी वातावरणात गुंग झाल्याने त्याचा परिणाम विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर झाला आणि दहशतवाद्यांनी शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन विमानात प्रवेश केला. काठमांडूच्या या विमानतळावर तसेही एकूण सुरक्षेबाबत सावळा गोंधळ होता आणि त्याचा दहशतवाद्यांनी फायदा उचलला.

सुरुवातीच्या धक्क्यानंतर कॉकपिट चालक दलाने नवीन परिस्थितीशी जुळवून घेतले आणि कॅप्टन शरण यांनी चतुराईने विमानाच्या अपहरण संदर्भात जमिनीवरील नियंत्रण कक्षास माहिती दिली. विशेष म्हणजे अपहरणानंतर काही मिनिटांनंतर हे विमान भारताच्या पंतप्रधानांच्या व्हीव्हीआयपी विमानाच्या जवळून प्रवास करत गेले पण पंतप्रधानांना मात्र या अपहरणाची माहिती दिल्लीला पोचल्यावर मिळाली.खाली जमिनीवर हा संदेश मिळाल्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्या आणि कॅबिनेट सचिव श्री प्रभात कुमार यांच्यामार्फत ही परिस्थिती सांभाळण्यासाठी क्राइसिस मॅनेजमेंट ग्रुप (सीएमजी) कार्यान्वित करण्यात आले. तथापि, या अपहरणाने स्तंभित झालेल्या या क्राइसिस मॅनेजमेंट ग्रुपला सुरूवातीला १९९५मध्ये बनवलेल्या सुरक्षा आकस्मिक योजनेनुसार वेगवान हालचाली करण्यात अपयश आले.

दुसरीकडे आयसी८१४ मध्ये अपहरणकर्त्यांनी विमान लाहोरला नेण्याचे आदेश दिले. कमी इंधन आणि लाहोर एटीसीने उतरण्यास परवानगी नाकारल्यामुळे विमानाला इंधन भरण्यासाठी अमृतसरमध्ये उतरावे लागले. यामुळे हे संकट संपवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची भारताला मोठी संधी मिळाली होती. त्याच उद्देशाने विमानामध्ये इंधन भरण्यास जाणीवपूर्वक उशीर करण्यात आला. तथापि, विविध संस्थांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव, योग्य संप्रेषणाचा (communication) अभाव आणि अमृतसर विमानतळाने आणीबाणीच्या ड्रिलचे पालन न केल्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात भारतीय सुरक्षा संस्थांना अपयश आले. शेवटी, विमानाने अमृतसरवरून उड्डाण केले आणि लाहोरमध्ये दाखल झाले जेथे विमानामध्ये इंधन भरण्यात आले. यावेळी कॅप्टन शरण आणि सह-पायलट राजिंदर यांनी लाहोर एटीसीकडे विमानातील महिला, लहान मुले आणि वृद्ध लोकांना लाहोर मध्येच उतरण्याची परवानगी द्यायची वारंवार विनंती केली परंतु ही विनंती नाकारण्यात आली आणि विमानाला लाहोरमधून उड्डाण घेण्यास सांगितले गेले.

लाहोर नंतर, आयसी८१४ अफगाणिस्तानात काबूलच्या दिशेने निघाले. तथापि, काबुल विमानतळ बंद होते आणि काबुलमध्ये रात्रीचे लँडिंग देखील शक्य नव्हते. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी वैमानिकांना विमान दुबईकडे वळवण्याची सूचना केली. या प्रवासादरम्यान, आयसी८१४ ला इराण आणि ओमान यांनी हवाई क्षेत्र नाकारले, ज्यामुळे विमानाचा प्रवास आणखी कठीण झाला. दुबईनेही विमानाला उतरण्याची परवानगी नाकारली आणि वैकल्पिक विमानतळ म्हणून अल-मिन्हाद चा विमानतळ सुचवला जो युएईचा हवाई दल तळ होता.

इकडे नवी दिल्लीमध्ये, सर्व एजन्सीज विमानाची आणि अपहरण करणार्‍या दहशतवाद्यांची अधिक माहिती मिळविण्यासाठी वेगाने काम करीत होत्या. अमेरिकेची मदतही घेण्यात आली आणि अल-मिन्हाद एअरफोर्स तळावर यूएई चे प्रिन्स ऑफ क्राउन आणि अमेरिकन प्रतिनिधींनी सुरुवातीच्या वाटाघाटी केल्या. तथापि, भारतीय मुत्सद्दी लोकांना हवाई दलाच्या तळामध्ये आत येण्याची परवानगी देण्यात आली नाही. या वाटाघाटीच्या परिणामी अपहरणकर्त्यांनी काही प्रवाशांना सोडण्यासाठी सहमती दर्शविली.

इंधन भरल्यानंतर आयसी ८१४ ने काबूलला प्रयाण केले. तथापि, काबुल एअरपोर्टने कळवले की बॉम्बस्फोटांमुळे काबूल विमानतळाच्या धावपट्टीवर मोठे खड्डे झाल्यामुळे आयसी८१४ सारखे मोठे विमान काबूलमध्ये उतरणे शक्य नाही. काबुलने त्यांना कंदाहारच्या दिशेने जाण्याची सूचना केली. अखेर आयसी८१४ काबूल पासून जवळपास ५०० किमी दूर असलेल्या कंदाहारला दाखल झाले आणि तिथेच ते पुढील साडेसात दिवस थांबले.

Image Courtesy – Google

आयसी८१४ चा कंदाहार मधील मुक्काम हा प्रवाशांच्या आणि केबिनच्या क्रूच्या भावनांची परीक्षा घेणारा ठरला. कंदाहार तालिबानच्या नियंत्रणाखाली असल्याने आणि तालिबानी राजवटीला भारताने मान्यता दिली नसल्याने या प्रसंगी तालिबानशी संपर्क कसा स्थापित करावा याबाबत भारताची राजनैतिक कोंडी झाली होती. तालिबान राजवटीला मान्यता देणारे फक्त तीनच देश होते – पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि युएई. तालिबानशी संपर्क स्थापित करण्यासाठी मदत करण्याबाबत युएई आणि सौदी अरेबियाकडून नवी दिल्लीला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आणि जनरल मुशर्रफ यांनी लोकशाही सरकारचा पाडाव करून पाकिस्तानमध्ये लष्करी शासन स्थापन केल्यामुळे पाकिस्तानकडून मदत मिळविण्यास भारत सरकार उत्सुक नव्हते.

येथे आयसी८१४ मध्ये भारताकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने अपहरणकर्ते अधीर होत होते आणि लवकरच भारताकडून प्रतिसाद न मिळाल्यास विमानाला उडवून टाकण्याची धमकी अपहरणकर्त्यांनी दिली.कंदाहार मध्ये दहशतवाद्यांशी सुरुवातीच्या वाटाघाटीची सुरुवात संयुक्त राष्ट्रसंघाच्या टीमने केली आणि त्यानंतर भारताने तालिबानशी संपर्क स्थापित केला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव श्री विवेक काटजू आणि आयबी अधिकारी श्री अजित डोवाल (विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) यांचा समावेश असलेल्या भारतीय शिष्टमंडळाने अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी सुरू केल्या.

Image Courtesy – Google

डोभाल अपहरणकर्त्यांशी बोलत असताना, काटजू यांनी तालिबानशी संधान साधले आणि कंदाहार मध्ये कमांडो कारवाईची शक्यता चाचपण्याचा प्रयत्न केला. मात्र तालिबानने कंदहारमध्ये रक्तपात नको म्हणून कोणत्याही कमांडो कारवाईस सरळ नकार दिला. या सखोल वाटाघाटी मध्ये बरेच चढ उतार आले आणि अखेर भारतीय कारागृहातून तीन दहशतवाद्यांना सोडण्याच्या बदल्यात सर्व ओलिसांना सोडण्यास दहशतवाद्यांनी सहमती दर्शविली. तत्कालीन परराष्ट्र मंत्री श्री. जसवंतसिंग हे तीनही अतिरेक्यांसह कंदाहार येथे पोहोचले आणि शेवटी हे संकट संपुष्टात आले.

हे पुस्तक का वाचले पाहिजे? जसे आधी म्हटल्याप्रमाणे, हे पुस्तक आयसी८१४ मध्ये घडलेल्या घटनांचा प्रत्यक्षदर्शी अहवाल देते. पुस्तकात वापरलेली भाषा समजण्यास सोपी आहे आणि तरीही घडलेल्या सर्व घटना प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभी करण्यास सक्षम आहे. पुस्तकात सर्व घटना या क्रमाने दिल्या आहेत आणि कोणीही हे पुस्तक वाचताना या विमानातील सर्व प्रवाशी आणि कर्मचार्‍यांची मानसिक घालमेल अनुभवू शकतो. हे पुस्तक कोणत्याही थरारक कादंबरी पेक्षा कमी नाही. हे संकट समाप्त करण्यासाठी गुंतलेल्या विविध एजन्सींनी केलेल्या कृतींबद्दलही पुस्तक या पुस्तकात नमूद केले आहे आणि त्यांच्या कृतींचे समीक्षात्मक विश्लेषण केले आहे.

पुस्तकातून हे स्पष्ट होते की या या प्रसंगी भारताला जगातील कोणत्याही देशाकडून मनापासून पाठिंबा मिळाला नाही आणि इतर देशांकडून मिळणारी थोडीशी मदत वगळता, भारताला स्वतःहून हे प्रकरण हाताळावे लागले. जर एखाद्याला खरोखर स्वातंत्र्याचे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर आयसी८१४ विमानाच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य माहिती मांडणारे हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे.

Image Courtesy – Google

या संपूर्ण प्रकरणातून खालीलप्रमाणे काही धडे घेतले जाऊ शकतात:

(अ) हे पुस्तक वाचल्यानंतर, हे स्पष्ट झाले की अपहरण करण्याची ही संपूर्ण योजना सर्व बारीकसारिक गोष्टींचा विचार करून अत्यंत व्यावसायिकपणे आणि गोपनीय पणे आखली गेली होती. परंतु, मग हा प्रश्न पडतो की भारतीय इंटेलिजन्स एजन्सीना या योजनेची माहिती का मिळाली नाही. शिवाय, अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएने भारतीय गुप्तहेर संस्था रॉ ला अशा प्रकारच्या संभाव्य घटनेविषयी थोडी माहिती दिली होती, परंतु हे अपहरण थांबवता आले नाही.

(ब) अशा प्रकारच्या घटना हाताळताना विविध एजन्सींमध्ये अधिक समन्वय आवश्यक आहे. यासाठी नियमित मॉक ड्रिल करून त्यात समोर आलेल्या कमतरता दूर करणे आवश्यक आहे.

(क) परराष्ट्र धोरण असे असले पाहिजे ज्यात नवी दिल्लीला मदतीसाठी बहुमूल्य वेळ वाया घालवत जगभर फिरण्याची गरज भासणार नाही. जग स्वत:हून भारताच्या मदतीला येईल.

(ड) अशा संकटकाळात प्रसारमाध्यमांना हाताळण्याबाबतचे धोरण स्पष्ट असले पाहिजे आणि त्याची काटेकोरपणे अमलबजावणी करणे आवश्यक आहे. ही गरज २००८मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातही भासली होती.

या पुस्तकाच्या लेखकांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

(अ) श्री अनिल के जग्गीया हे अपहृत उड्डाण आयसी ८१४ चे उड्डाण अभियंता होते. ते इंडियन एअरलाइन्समध्ये फ्लाइट इंजिनीअरिंगचे चीफ होते आणि त्यांना फ्लाइट इंजिनियर म्हणून २०००० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. एअरबस ए३०० विमानाच्या तांत्रिक गोष्टींचे प्रशिक्षक आणि परीक्षक असलेले जग्गिया यांनी कोलकाताच्या एटीआय (एअर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) येथे तांत्रिक शिक्षण घेतले आणि ते ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड येथील ३५व्या एअर ट्रान्सपोर्ट कोर्सचे पदवीधर देखील आहेत.

(ब) सौरभ शुक्ला तपास पत्रकार आहेत. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. युकेमध्ये दहशतवाद आणि अनियमित युद्ध यावर कोर्स केला आहे.

आज या घटनेला २२ वर्षे उलटून गेली असली तरी यातून घेतलेले धडे आजही तितकेच प्रासंगिक आणि महत्वपूर्ण आहेत. दहशतवादाचा भस्मासुर आज भेसूर रूप घेत असताना अशा प्रकारच्या घटनांपासून योग्य बोध घेऊन भविष्यात अशा घटना होऊ नयेत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आयसी८१४ विमानाच्या अपहरणाची प्रत्यक्षदर्शी आणि सत्य माहिती मांडणारे हे पुस्तक फार उपयुक्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *