स्वत:ला देशभक्त म्हणवणार्या व्यक्ती वा संघटनांना आपल्या देशभक्तीचे पुरावे देण्यासाठी कोणतेही अमानुष कृत्ये करण्याची गरज नसते. असे लोक व संघटना संकटाच्या समयी आपल्या देशवासीयांना एकाकी सोडून पळून जात नाहीत. परंतू हाच प्रकार जर्मनी मध्ये दुसर्या महायुद्धानंतर घडला आणि ज्यूं वर अनन्वित अत्याचार करणारे नाझी हे कृत्य देशासाठी केल्याचे लंगडे समर्थन करत लपून छपून आपली कारवाई करत राहिले. अर्थात त्यांना पकडले जाऊन युद्धगुन्हयासाठी शिक्षा मिळण्याची भीती पण होती. परंतु ज्यूंच्या नवनिर्मित इस्राइल या देशाने जमेल तेवढ्या नाझी लोकांना पकडून बदला घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला. अशीच एक थरारक कथा फ्रेडरिक फोरसीथ यांच्या ‘ओडेसा फाइल’ या पुस्तकात देण्यात आली आहे.
या कथेची सुरुवात होते जर्मनीच्या हम्बुर्ग मध्ये ! पिटर मिलर नावाचा एक मुक्त पत्रकार उपनगरातील आपल्या आईला भेटून परत येत असताना त्याला एक अॅम्ब्युलन्स शहराच्या एका गलिच्छ वस्तीकडे जाताना दिसते. एखादी चांगली बातमी मिळेल या आशेने पिटर त्या अॅम्ब्युलन्स च्या मागे जातो. त्या वस्तीमध्ये टाउबर नावाच्या एका वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केलेली असते. बातमीच्या दृष्टीने या घटनेत काहीच मूल्य नसल्याने काहीसा निराश झालेला पिटर तिथल्या पोलिस अधिकार्याला (जो त्याचा मित्र असतो) भेटून परत येतो. दुसर्या दिवशी तोच पोलिस अधिकारी पिटरला टाउबारची एक डायरी त्याला वाचायला देतो. त्याला वाटते त्या डायरीमुळे पिटरला एक स्टोरी मिळून जाईल. ही डायरीच या कथानकाची ट्रीगर ठरते असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
टाउबर हा एक जर्मन ज्यू असतो ज्याने दुसर्या महायुद्धात रिगा नावाच्या छळछावणीत अत्याचार भोगलेले असतात. ते सर्व अनुभव त्याने या डायरीत लिहून ठेवलेले असतात. युद्ध संपल्यावर नाझींविरूद्ध युद्ध गुन्ह्यांसाठी खटले दाखल झाल्यास त्यांच्याविरूद्ध साक्ष देण्यासाठी टाउबर इतका छळ सोसूनही जिवंत राहिला होता. आणि नाझींविरुद्ध पुरावा म्हणून त्याने ती डायरी जपून ठेवली होती. मुख्य म्हणजे रिगा छळछावणीचा कमांडंट कॅप्टन एडवर्ड रोशमन याला त्याच्या क्रूर कृत्यांसाठी शासन व्हावे या एकाच इच्छेने टाउबर जिवंत राहतो. पण जसजसा काळ पूढे सरकतो तसा गायब असलेला रोशमन आता कायद्याच्या कचाट्यात येत नाही हे जाणवल्यावर निराश झालेला टाउबर अखेर आत्महत्या करतो.ती डायरी वाचून पीटर अंतर्बाह्य हादरतो आणि कॅप्टन एडवर्ड रोशमनचा शोध घ्यायचा निश्चय करतो. अर्थात हा शोध अजिबात सोपा नसतो आणि पीटरला लवकरच याची जाणीव होते. पण पीटरचा निश्चय अढळ असल्याने कोणत्याही परिस्थितीत ही शोध मोहीम पूर्ण करायचीच या भावनेने तो झपाटल्यासारखा रोशमनच्या शोधासाठी बाहेर पडतो.
या शोधमोहिमेत तो जर्मनी तसेच लंडनमधील काही व्यक्ती व संघटनांना भेटून रोशमनचा सध्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करतो. खरे तर पीटर मीलर प्रमाणेच इस्राइलची गुप्तहेर संघटना मोस्साद आणि इतर काही ज्यू संघटना नाझी एस एस लोकांचा माग काढण्याचा प्रयत्न करत असतात. किंबहुना याची जाणीव असल्यानेच हे क्रूरकर्मा एस एस नाझी एक तर जर्मनी मधून पलायन करतात किंवा जर्मनीमध्येच बनावट ओळख घेऊन राहतात. त्यांना या सर्व कामांसाठी मदत करता यावी म्हणून ‘ओडेसा’ नावाची एक गुप्त संघटना स्थापन करण्यात आलेली असते. ही संघटना माजी एस एस नाझी कर्मचार्यांना त्यांची ओळख गुप्त ठेवणे तसेच त्यांना रोजगार देऊन नवीन आयुष्यात स्थिरस्थावर व्हायला मदत करणे इत्यादी मुख्य कामे करत असे.
रोशमनाच्या शोध मोहिमेच्या थरारा सोबतच या कथानकात आंतरराष्ट्रीय कट कारस्थानाची सुद्धा पार्श्वभूमी आहे. ओडेसा इजिप्तच्या मदतीने रॉकेट्स च्या द्वारे इस्रायलवर जैविक हल्ला करण्याची योजना बनवत असतात. दुसर्या महायुद्धात नाझींनी ज्यूंवर केलेल्या अत्याचाराचे प्रायश्चित्त म्हणून पश्चिम जर्मनी (युद्धानंतर जर्मनीची अमेरिकेच्या नियंत्रणाखालील पश्चिम जर्मनी आणि सोव्हिएत यूनियन च्या नियंत्रणाखालील साम्यवादी पूर्व जर्मनी अशी विभागणी झाली होती. कालांतराने १९९० मध्ये दोन्ही जर्मनींचे विलींनीकरण झाले) व इस्राइल मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रास्त्र पूरवठा करार होणार असतो ज्यानूसार प.जर्मनी इस्राइलला शस्त्रपुरवठा करणार होती. ओडेसाचा या कराराला विरोध असतो आणि म्हणूनच ते प्रथम त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्रपती केनेडी यांची हत्या करतात आणि नंतर इस्रायलवर हल्याची योजना आखतात. या हल्यामध्ये वापरण्यात येणार्या क्षेपणास्त्रामध्ये अत्यंत महत्वाची असणार्या बॅटरीचे उत्पादन रोशमन (अर्थातच आपले नाव बदलून) प.जर्मनी मधल्या आपल्या फॅक्टरी मध्ये करत असतो. ओडेसा च्या रॉकेट्स हल्याच्या यशस्वितेसाठी हे बॅटरी उत्पादन लवकर व विनासायास होणे अत्यंत गरजेचे असते.
दुसरीकडे इस्राईलला सुद्धा अशा प्रकारच्या हल्याची गुप्त सूचना असल्याने ते रोशमनचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच मोसाद पीटर मिलरला त्याच्या शोधमोहिमेत मदत करण्यासाठी पुढे येते. पीटरला त्याच्या शोधमोहिमेत प्रकर्षाने जाणवते ती गोष्ट म्हणजे जर्मन प्रशासनाला नाझी लोक आणि त्यांच्या ठावठिकाणा बद्दल असलेली उदासीनता. कदाचित दुसरे महायुद्ध आणि नाझी सरकारचा तो काळ यात जर्मन प्रशासन आणि सर्वसामान्य जर्मन जनतेला अजिबात उत्सुकता नव्हती. कदाचित प्रशासनामध्ये नाझी लोकांबद्दल सहानभुती बाळगणारे काही लोक अजूनही होते. त्यामुळेच पीटर ने जंग जंग पछाडूनही त्याला जर्मन प्रशासनाकडून फारसे सहकार्य वा माहिती मिळाली नाही जी त्याला रोशमनच्या ठिकाणाबद्दल ठोस धागादोरा देईल. म्हणूनच मोसाद पीटरला एक माजी नाझी एस एस सैनिक म्हणून ओडेसा मध्ये घुसवण्याची योजना बनवते. त्यासाठी एक माजी नाझी एस एस अधिकारी पीटरला आवश्यक ते प्रशिक्षण देतो आणि पीटर यशस्वीपणे ओडेसा मध्ये प्रवेश करतो. या सर्व घडामोडी घडत असताना ओडेसा तर्फे पीटरला रोशमन ची शोधमोहीम सोडून देण्याची धमकी पण देण्यात येते. पण पीटरने ती न जुमानल्यामुळे त्याच्यावर मारेकरी पण सोडला जातो. पीटर ची शोधमोहीम आणि त्याच्या मारेकर्याचा पाठलाग हे एकदम समांतर चालू असतात आणि एक थरारक कथानक वाचल्याचा आनंद मिळतो.
हे पुस्तक वाचताना एक प्रश्न नक्की मनात येतो तो म्हणजे स्वत: एक जर्मन असूनही पीटर रोशमनला शोधण्यासाठी एवढा पछाडून का गेला होता? या प्रश्नाचे उत्तर पुस्तकाच्या शेवटी मिळते. पीटरच्या जर्मनीच्या सैन्यात असलेल्या वडिलांची रोशमनने हत्या केलेली असते. टाउबरची डायरी वाचल्यावर त्याला या रहस्याचा उलगडा होतो. पीटरची ही शोधमोहीम भूतकाळातील अनेक ज्ञात अज्ञात घटना व पैलूंवर प्रकाश टाकते ज्यातून एस एस चे ज्यूं वरील अत्याचार उजेडात येतात. या एकंदरीत अत्याचारांची व्याप्ती पाहून मन अगदी सून्न होऊन जाते. आपल्या वंशाचा अवाजवी अभिमान बाळगत निरपराध ज्यूंची केली गेलेली हत्या नक्कीच मानवतेवर एक कलंक आहे पण स्वत:ला मानव म्हणवून घेण्याच्या आपल्या जाणीवतेवर एक फार मोठे प्रश्नचिन्ह पण आहे. नाझी सरकारने जर्मनीच्या दुरावस्थेसाठी नेहमीच ज्यूंना जबाबदार ठरवले आणि त्यांची कत्तल केली. हे एक देशभक्तीपूर्ण काम आहे असे म्हणणारे एस एस चे अधिकारी महायुद्धात जर्मनी पराभूत झाल्यावर मात्र आपल्या नागरिकांना संकटात तसेच सोडून निघून गेले. किंबहूना याची तयारी त्यांनी पराभव समोर दिसू लागताच आधीपासूनच केलेली होती. बिनबुडाच्या तत्वज्ञानासाठी निरपराध लोकांची हत्या करणे कधीही नाही देशभक्ती असू शकते नाही समर्थनीय. हे पुस्तक आपल्याला थरारक कथा वाचण्याचा आनंद तर देतेच पण मानवतेच्या पैलूचा नव्याने विचार करण्यासही भाग पाडते.
NICELY WRITTEN. Inspired me to read this book. Thank you