गांधी vs जिन्ना – भाग १ – राजकीय जडणघडण

१९व्या शतकात दोन सुशिक्षित वकिलांनी दक्षिण आशियाच्या इतिहास, भूगोल आणि भविष्य सुनिश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. एक होते मोहम्मद अली जिन्ना , ज्यांच्या हट्टाहासामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली आणि दुसरे होते मोहनदास करमचंद गांधी, ज्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करताना भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसात्मक चळवळ चालवली. एकेकाळी एकमेकांचे सहकारी असलेले हे दोघे एकमेकांचे विरोधक कसे बनले? एक धर्मनिरपेक्ष उदारमतवादी म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे जिन्ना नंतर मुस्लिमांचे एकदम कट्टर नेते कसे बनले? आणि एक नैतिक समाजसुधारक असलेले गांधी राष्ट्रीय नेते कसे बनले? त्या दोघांची राजकीय जडणघडण कशी झाली? या दोघांच्या विचारसरणीमध्ये असलेल्या मूलभूत मतभेदांची परिणीती कशा प्रकारे दक्षिण आशियाचे भवितव्य बदलणार्‍या दोन देशांच्या निर्मितीमध्ये झाली?

या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी गांधी आणि जिन्ना यांना समजणे महत्वाचे आहे. Roderick Mathew यांनी लिहिलेले ‘Jinnah vs Gandhi’ हे पुस्तक या दोघांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकते.पुस्तकात चार भागात या दोघांचे व्यक्तिमत्व आणि तत्कालीन भारतीय राजकारणस्वातंत्र्यलढा यावर लेखकाने भाष्य केले आहे. यापैकी आजच्या या पहिल्या भागात आपण पुस्तकाचा पहिला भाग म्हणजेच दोघांची राजकीय जडणघडण पाहणार आहोत.

जिन्ना vs गांधी

मूलभूत पैलू

स्वावलंबन, स्वयंपूर्णता (आत्मनिर्भरता), स्वनियंत्रण अशा त्रिसूत्रीचा नेहमी आपल्या जीवनात पालन करणार्‍या गांधीजींच्या राजकीय चळवळी या कोणत्याही उच्च राजकीय ध्येयावर नाही तर व्यक्तिगत अनुभवावर आधारलेल्या होत्या. ही त्रिसूत्री त्यांच्या राजकीय जडणघडणचा महत्वाचा भाग होती. गांधीजींचा स्वत्वावर प्रचंड विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत ब्रिटिश, जिन्ना इत्यादींना नेहमीच विविध विषयांवर व्यक्तिगत आवाहन केले. इतकेच नाही तर गांधीजींनी एक व्यक्तिगत पत्र लिहून चक्क हिटलरला दुसरे महायुद्ध थांबवण्याचे आवाहन केले होते. काहीही भव्यदिव्य करण्याआधी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देण्याकडे त्यांचे प्राधान्य असायचे. त्यांनी नेहमीच स्वत:चे प्रतिनिधित्व केले आणि नेहमी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला. गांधीजींनी आध्यात्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला. यातून त्यांना देशातील लोकांच्या नैतिक सुधारणा अपेक्षित होत्या. छोट्या छोट्या स्तरावर सुधारणा करत करतच मोठ्या प्रमाणात देशात सुधारणा करता येतील या मताचे गांधीजी होते. म्हणजेच ग्रामीण स्तरावर आवश्यक सुधारणा केल्यास आपोआप देशही प्रगतीच्या वाटेवर चालू लागतो. म्हणूनच त्यांनी ‘खेड्याकडे चला‘ असे आवाहन केले.

गांधीजींना भारताच्या स्वातंत्र्यापेक्षा या स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्य भारतीयाला काय मिळेल? यात रस होता. स्वातंत्र्यासोबत व्यक्तीला त्याचा जीवनस्तर उंचावण्याचे स्वातंत्र्य ही मिळाले पाहिजे अशी त्यांची धारणा होती.त्यांना भारताला ‘इंग्लिस्तान’ बनवायचे नव्हते ज्यामध्ये ब्रिटिशांप्रमाणे एक भारतीय दुसर्‍या भारतीयाची पिळवणूक करेल. गांधीजींसाठी स्वातंत्र्य म्हणजे भारतीयांसाठी एकमेकांच्या सहकार्याने प्रगती करण्यासाठी आवश्यक ती संधी देणे अभिप्रेत होते. गांधीजींनी सक्षम सहकारी निवडले नाहीत तर त्यांनी सहकारी निवडून त्यांना सक्षम केले. सत्याच्या मार्गावर चालल्यावर विजय मिळण्यास उशीर होईल पण म्हणून असत्याच्या मार्गावर चालणे त्यांना मान्य नव्हते. गांधीजींनी ब्रिटिशांचा द्वेष केला नाही पण त्यांना भारतावर राज्य करण्याचा काही अधिकार नाही या ठाम मताचे ते होते.

दोघांची राजकीय जडणघडण

गांधीजी कोणत्याही एका धर्मासाठी कट्टर नव्हते तर त्यांनी प्रत्येक धर्मात जे जे चांगले आहे ते घेण्याचा प्रयत्न केला. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नाही आणि म्हणूनच कोणताही धर्मसुद्धा परिपूर्ण नाही असे त्यांचे परखड मत होते. गांधीजींसाठी राजकारण हे केवळ संसदीय राजकारण नव्हते तर ते जनतेसाठी केलेले राजकारण होते. त्यांनी सामान्य भारतीयाला भारतीयत्वाची जाणीव करून दिली. गांधीजींचे हे भारतीयत्व सामान्य लोकांना सहज समजण्यासारखे होते.

दुसरीकडे एक व्यक्ति म्हणून जिन्नांना मैत्री जपण्यात फारसे स्वारस्य नव्हते आणि म्हणूनच त्यांचे फार कमी मित्र आणि सहकारी होते. जिन्ना एक पारंपारिक राजकारणी होते ज्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ब्रिटिशांना विरोध करणारा भारतीय म्हणून केली होती परंतू नंतर त्यांचा दृष्टीकोण संकुचित होत गेला आणि ते मुस्लिमांचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणारे नेते बनले. गांधींप्रमाणे आध्यात्मिक राजकारणाच्या भानगडीत न पडता राजकारण म्हणजे सत्ता मिळवणारे एक साधन आहे असेच ते नेहमी मानायचे. समाजाची प्रगती ही योग्य कायदे व संस्थांद्वारेच होते असे जिन्नांचे मत होते.

चांगले काम करण्यासाठी त्यांना नेहमीच चांगल्या लोकांची गरज पडायची. ते आपल्या सहकार्‍यांना चांगल्या कामांसाठी सक्षम करण्याबाबत उदासीन होते. जिन्नांसाठी अंतिम ध्येय नेहमी महत्वाचे होते आणि त्यासाठी कोणतेही मार्ग पत्करायची त्यांची तयारी होती. म्हणजेच योग्य, अयोग्य अशा कोणत्याही मार्गांचे त्यांना वावडे नव्हते (पाकिस्तानच्या निर्मितीवेळी हे दिसून आले). याउलट गांधीजींनी मात्र आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. यांच्यासाठी अंतिम ध्येयापेक्षा ते प्राप्त करायचे मार्ग जास्त महत्वाचे होते. जिन्नांनी सुरुवात एक उदारमतवादी भारतीय म्हणूनच केली होती परंतु परिस्थितीनुसार त्यांचा प्रवास मुस्लिम कट्टरतावादी कडे चालू झाला. हेच जिन्ना एकेकाळी ब्रिटन आणि ब्रिटिश संस्कृतीचे चाहते होते पण याचा भारतातील ब्रिटिश सत्तेला विरोध करायच्या त्यांच्या भूमिकेवर काही परिणाम झाला नाही. मुस्लिम धर्माची महत्वाची तत्वे स्वातंत्र्य, समानता यानुसार त्यांना मुस्लिम समाजावर ब्रिटिश किंवा ‘कोंग्रेसी हिंदू’चे राज्य नको होते आणि म्हणूनच त्यांनी नंतर पाकिस्तानची मागणी पुढे रेटली. जिन्ना हे पूर्ण आयुष्यभर साम्राज्यशाही विरोधी आणि मुस्लिम नेता बनून राहिले.

सत्याग्रह

गांधीजींनी अहिंसेशी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्यासाठी अहिंसा म्हणजे व्यक्तीची नैतिकता उंचावण्याचे एक महत्वाचे साधन होते. केवळ हिंसा न करणे एवढाच अहिंसेचा संकुचित अर्थ नव्हता तर अहिंसा म्हणजे गरीबी, विषमता, अन्याय इत्यादी गोष्टी समाजातून दूर करणे. एकप्रकारे अहिंसा ही एक जीवनपद्धती होती. ब्रिटिशांच्या अत्याचाराविरूद्ध गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह केला. योग्य पद्धतीने सत्याग्रह केल्यास शत्रूला त्याच्या गैरकृत्यांची जाणीव होते आणि शत्रूवर प्रेमाने विजय मिळवता येतो यावर त्यांची गाढ श्रद्धा होती. गांधींवर अहिंसेच्या बाबतीत सातत्याचा अभाव असल्याची टीका पण झाली (ही टीका त्यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटीशांना मदत करण्यासाठी सैन्य भरती करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे झाली) पण हे आरोप फेटाळून लावताना आपण अहिंसेच्या तत्वावर ठाम असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. १९१९ मध्ये खिलाफत चळवळीला पाठिंबा देऊन कॉँग्रेसच्या राष्ट्रीय व धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का पोचवल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला पण आपण हे केवळ भारतातील हिंदू-मुस्लिम यांच्यातील एकता वाढवण्यासाठी केले असे सांगून गांधीजींनी आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला.

भारतीय स्वातंत्र्यलढा

द्विराष्ट्र सिद्धांत

द्विराष्ट्र सिद्धांताच्या इतिहासाचा मागोवा घ्यायचा झाल्यास सर सय्यद अहमद खान (१८१७-१८९८) यांच्या काळात डोकावावे लागते. त्यांनीच सर्वप्रथम भारतातील मुस्लिम समाजाला उद्देशून ‘एक राष्ट्र’ असे संबोधले होते. पण त्यांना जिन्नांचा द्विराष्ट्र सिद्धांत अभिप्रेत नव्हता. उलट हिंदू-मुस्लिम एकत्र गुण्यागोविंदाने नांदू शकतात असे त्यांनी म्हटले होते. जिन्नांच्या मते भारतामध्ये ‘हिंदू’ आणि ‘मुस्लिम’ ही दोन राष्ट्रे वसतात आणि त्यांचे एकत्र राहणे आता जवळपास अशक्य आहे. १९०९ ते १९३५ पर्यंत भारतामध्ये संवैधानिक सुधारणांचे वारे वाहत होते. या काळात जिन्नांनी कधीही द्विराष्ट्र सिद्धांत मांडला नाही. उलट ते या काळात मुस्लिमांना योग्य ते राजकीय अधिकार मिळावेत म्हणून कॉंग्रेसशी समझोता करण्याचे प्रयत्न करत होते. या काळात मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी त्याच्या मनातही नव्हती.

१९३५ नंतर भारताच्या राजकीय क्षितिजावर मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची (पाकिस्तान) मागणी पुढे येऊ लागली. सर्वप्रथम कवी मोहम्मद इक्बाल आणि नंतर जिन्नांनी ही मागणी हळूहळू पुढे रेटण्यास सुरुवात केली. या सिद्धांतानुसार ज्या प्रदेशात मुस्लिम बहुसंख्य आहेत त्या प्रदेशांचे मिळून एक राष्ट्र बनने अभिप्रेत होते. मात्र यामध्ये भारताच्या इतर भागात राहणार्‍या आणि त्या त्या भागात अल्पसंख्य असलेल्या मुस्लिमांचा विचार केलेला नव्हता. स्वतंत्र भारतात मुस्लिमांवर अन्याय होईल म्हणून पाकिस्तानची मागणी करणारे जिन्ना फाळणीनंतर उर्वरीत भारतात राहणार्‍या अल्पसंख्य मुस्लिमांची मात्र काळजी करत नव्हते. जिन्नांचा हा द्विराष्ट्र सिद्धांत एवढ्या ठिसूळ पायावर उभा होता की तो १९७१ मध्ये पाकिस्तानची फाळणी होण्यापासून रोखू शकला नाही.

नेतृत्व

नेतृत्व दोन प्रकारचे असते. एक नेतृत्व जनतेसोबत संघर्ष करते, त्यांना धोरण देते, ते धोरण अमलात आणण्यासाठी मार्गदर्शन करते आणि त्या धोरणाकडे आकर्षित झालेल्या लोकांचे नेतृत्व करते. दुसर्‍या प्रकारचे नेतृत्व हे सर्वप्रथम एखाद्या संघटनेमध्ये पद धारण करते आणि मग एका ठरावीक लोकांचे (एका ठरावीक समूहाचे) नेतृत्व करते. गांधी हे पहिल्या प्रकारचे नेते होते ज्यांनी भारतीय राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्यात देशव्यापी सामूहिक आंदोलनाची नवीन संकल्पना पुढे आणली. त्याआधी ब्रिटिशांविरुद्ध (१८५७ चा अपवाद वगळता) देशव्यापी आंदोलने झालेली नव्हती. गांधीजींनी ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी जनतेला कार्यक्रम दिला आणि त्याचे नेतृत्व केले.

मोहनदास करमचंद गांधी

जिन्ना हे दुसर्‍या प्रकारचे नेते होते ज्यांनी सुरूवातीला काँग्रेस आणि नंतर मुस्लिम लीग मध्ये जबाबदारी सांभाळली आणि मग राष्ट्रीय पातळीवर मुस्लिम समाजाचे नेते बनले. गांधी हे ब्रिटीशांचे प्रखर विरोधक होते आणि त्यांनी सत्याग्रहाच्या अभिनव मार्गाने ब्रिटिशांना जेरीस आणले. गांधी हे संघर्ष करणारे नेतृत्व होते. दुसरीकडे जिन्नांनी मात्र सोपा मार्ग निवडला. त्यांना वादविवाद करायला आवडायचे आणि म्हणून त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यापेक्षा निवडणूक जिंकून कायदेमंडळात जाऊन ब्रिटिशांना विरोध केला. म्हणूनच ब्रिटिशांसाठी जीना हे सोपे विरोधक होते तर गांधी हे जास्त त्रासदायक होते.

गांधी यांचे काँग्रेसवर पूर्ण प्रभुत्व होते. तर जीनांना मात्र मुस्लिम लीग वर पूर्ण प्रभुत्व निर्माण करायला संघर्ष करावा लागला. एक नेता म्हणून दोघांचे ध्येय एकच होते – ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावणे. पण ते कसे करावे याबाबत त्यांच्यामध्ये मतभेद होते. स्वातंत्र्याची सर्व योजना ब्रिटिशांच्या उपस्थितीत आणि देखरेखीखाली पार पाडली जावी याबाबत जिन्ना आग्रही होते. कारण काँग्रेसकडून मुस्लिम हिताचा कोणताही निर्णय होणार नाही याची त्यांना भीती होती. दुसरीकडे गांधीजी मात्र ब्रिटिशांनी ताबडतोब भारतातून निघून जावे या मताचे होते. भारताचे भवितव्य ठरवण्याचे काम ब्रिटिशांनी भारतीयांवर सोपवून निघून जावे असे त्यांचे मत होते. ब्रिटिशांची साम्राज्यशाही कशा प्रकारे संपुष्टात आणावी आणि स्वातंत्र्योत्तर भारत कसा असावा यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर या दोन्ही नेत्यांचे कधीही एकमत झाले नाही.

राजकारण आणि धर्म

धर्माचा राजकारणात प्रवेश स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आहे. १९०९ मध्ये आलेल्या मोर्ले मिंटो सुधारणांपासूनच धर्माधिष्ठित राजकारणाची सुरुवात झाली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या सुधारणांद्वारे देशात धर्मावर आधारित राखीव मतदारसंघ बनवण्यात आले आणि त्या मतदारसंघाचे नेतृत्व करणारा व्यक्ति हा लोकशाहीचे नाही तर एकप्रकारे त्या त्या धर्माचे/समूहाचे प्रतिनिधित्व करू लागला. ही परिस्थिती जिन्नांना अनुकूल होती तर गांधीजी याच्या विरोधात होते. गांधीजींच्या मते काँग्रेस कोण्या एका धर्माचे नाही तर सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर भारतीय मुस्लिमांचे प्रतिनिधित्व आपण करतो या जिन्नांच्या दाव्याशी ते सहमत नव्हते. धर्माचा भारतीय राजकारणात कायमस्वरूपी प्रवेश तेव्हा झाला ज्यावेळी जिन्नांनी द्विराष्ट्र सिद्धांतावर आधारित पाकिस्तानची मागणी करायला सुरुवात केली. हा सिद्धांत पूर्णपणे धर्मावर आधारलेला होता. मुस्लिम हे एक वेगळे राष्ट्र आहे हा जिन्नांचा त्यामागचा तर्क होता. परंतु पाकिस्तानची मागणी धर्मावर आधारलेली आहे हे जिन्नांनी कधीही मान्य केले नाही.

मोहम्मद अली जिन्ना

धर्म आणि राजकारण हे दोन्ही वेगळे विषय असून त्यांचे एकमेकांशी देणे घेणे नाही. राजकारणात धर्म आणू नये असे ते म्हणत. त्यांच्या मते नव पाकिस्तानात इस्लामी समाज हा भारतीय हिंदू समाजापेक्षा अधिक सहिष्णू असणार होता. जिन्नांनी पाकिस्तानची निर्मिती ही धर्मासाठी नाही तर मुस्लिमांना त्यांचे राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी आहे असेच नेहमी सांगितले. म्हणजेच ते हे ठसवण्याचा प्रयत्न करत होते की पाकिस्तानची निर्मिती धार्मिक गरज नसून ही राजकीय गरज आहे. दुसरीकडे गांधीजींनी एका ठराविक मर्यादेपर्यंत धर्माला राजकारणात आणले. किंबहूना याला आध्यात्मिक राजकारण म्हणणे योग्य होईल. गांधीजींची इच्छा होती की राजकारण हे नैतिकता आणि समाजकारण यांचे एक प्रभावी मिश्रण असावे. त्यांचा ब्रिटिशांशी लढा हा भारतीय समाजाच्या नैतिक विकासाशी जोडला गेला होता. जसे की ग्रामीण विकास, अस्पृश्यता निवारण, स्वच्छता इत्यादी. गांधी आणि जिन्ना यांनी एकप्रकारे धर्माचे महत्व कमी लेखले आणि तरीही देशाची फाळणी होण्यासाठी धर्म हाच एक निर्णायक घटक बनला.

दोन सुशिक्षित वकील

निष्कर्ष

जिन्ना आणि गांधी यांचे राजकीय विचार भिन्न असले तरी त्या दोघांच्या मध्ये एक सामाईक गोष्ट होती. दोघांनीही आपले एक स्वत:चे राजकीय विश्व उभे केले. गांधीजींनी भारताच्या राजकीय क्षितिजावर सुरूवातीला स्वतंत्र वाटचाल केली. चंपारण्य (बिहार) आणि खेडा (गुजरात) इथे ब्रिटीशांविरूद्ध यशस्वी लढा दिला. त्यानंतर ते काँग्रेस बरोबर जोडले गेले. काँग्रेस मध्ये असतानाही त्यांनी पक्षापासून वेगळे आपले व्यक्तिगत स्वतंत्र अस्तित्वही नेहमी जपले आणि म्हणूनच त्यांना बर्‍याच वेळा आपले विचार आणि कृती पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळे मांडता आले. दुसरीकडे जिन्नांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात एका पारंपारिक राजकीय नेत्याप्रमाणे काँग्रेस पक्षातून केली आणि राजकारणात बर्‍यापैकी प्रगती केली. इतर मुस्लिम नेत्यांच्या तुलनेत जिन्ना नेहमीच भारतीय मुस्लिमांची बाजू राष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी प्रयत्नशील राहिले. जिन्नांना भारतामध्ये नेहमीच एक असे राष्ट्रीय सरकार हवे होते ज्यामध्ये मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. राजकीयदृष्ट्या पाहिले तर गांधी आणि जिन्ना यांनी अनुक्रमे काँग्रेस आणि मुस्लिम लीग या पक्षांना आकार दिला आणि म्हणूनच या दोन्ही पक्षांमध्ये आपले प्रभुत्व निर्माण केले. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अभ्यासताना ही गोष्ट लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *